Thursday, January 26, 2023

ऑन द फिल्ड : प्रगती बाणखेले

जानेवारी २०२३. या ब्लाॅगवर लिहून ११ महिन्यांचा काळ लोटलाय. पण आता असे होऊ द्यायचे नाही असे मी ठरवले आहे. नव्या वर्षात दर महिन्याला एका मराठी पुस्तकाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करायचा निर्णय त्यासाठी घेतला आहे. त्यामुळे शिस्तीत वाचन आणि लेखनही होईल, असा हेतू आहे. अर्थात, हा निर्धार सिद्धीस जाण्यासाठी तुम्हा सगळयांच्या शुभेच्छा मात्र हव्या आहेत. जानेवारीसाठी मी आमचीच व्यवसायभगिनी अर्थात, पत्रकार प्रगती बाणखेले यांचे ‘ऑन द फिल्ड’ हे पुस्तक निवडले आहे. त्याचा माझ्या दृष्टिकोनातून करून दिलेला हा परिचय तुम्हाला कितपत भावतो हे मला प्रतिक्रिया नोंदवून कळवा, ही अपेक्षा आहे. पुढच्या महिन्यात राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या पुस्तकाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न असेल. 












पुस्तकाचा रसास्वाद 


लोकांना मोठमोठे लेख वाचायला आता वेळ नाही आणि त्यामुळे लहान आकारात लिहिलं पाहिजे,
हा विचार जसजसा बळावत चालला आहे तसतशी रिपोर्ताज् प्रकार लिहिणाऱ्यांची किंवा ज्याला
इंग्रजीत ‘लाँग फाॅर्म जर्नालिझम’ म्हणतात ती करणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली आहे. त्याचे
परिणाम काय होताहेत, याचा अजून फारसा कोणी म्हणजे पत्रकारीतेच्या क्षेत्रातील मंडळींनीच
पुरेशा गांभीर्याने विचार केलेला नाही. एखादा विषय, प्रश्न किंवा परिस्थिती जास्तितजास्त मितींतून
समजून घेण्याची भूक असणाऱ्यांची त्यामुळे काहीशी उपासमार सुरू आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत
मराठीतील अनेक साप्ताहिके काही प्रमाणात ही भूक भागवण्याचा प्रयत्न करीत होते; पण
अलिकडे त्यांची संख्याही इतकी रोडावली आहे की, मराठीत काही साप्ताहिके निघतात की नाही,
असा प्रश्न पडावा. जर वाचकांना लाँग फाॅर्म जर्नालिझमची भूक असेल तर ही साप्ताहिके, मासिके
का बंद पडताहेत, असा प्रश्न संक्षिप्त मजकुराचे समर्थन करणाऱ्यांकडून येऊ शकतो. त्यांचे
म्हणणे अगदीच चुकीचे आहे असेही नाही. किती लिहीले यापेक्षा काय आणि कसे लिहिले याला
अधिक महत्व असायला हवे, हा युक्तिवाद कसा नाकारता येईल? असो. त्यातल्या त्यात मराठीत
दिवाळी अंकांनी हा वृत्तांकनाचा प्रकार काही प्रमाणात का असेना सांभाळला आहे. अनेक दिवाळी
अंक तर उत्तम रिपोर्ताजसाठीच ओळखली आणि वाचली जातात. त्यामुळे काही विषय तरी
वेगवेगळ्या मितींतून, विविध अंगांनी समजून घेण्याची संधी त्याची गोडी असणाऱ्या वाचकांना
मिळते. 
अशीच वेगवेगळ्या दिवाळी अंकांतून वेगवेगळ्या विषयांवर रिपोर्ताज लिहीणारी पत्रकार प्रगती
बाणखेले यांनी त्यांच्या रिपोर्ताजचे पुस्तक ‘ऑन द फिल्ड’ या नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे.
पुस्तक फार मोठे नाही. अवघी १८४ पाने आहेत. त्यामुळे लवकर वाचून संपते. पण ते संपते तेव्हा
वेगळ्या जगाची ओळख वाचकाला झालेली असते. कारण जिथे सर्वसामान्य माणूस कधीच जाऊ
शकत नाही तिथे लेखिका पोहोचली आहे आणि त्यासाठी पत्रकारीतेचा तिला चांगला उपयोग झाला
आहे. मानवी हक्कांच्या अनुशंगाने लेखन आणि वार्तांकन करणारी ही पत्रकार उत्तम लेखिकाही
आहे. त्यामुळेच पुस्तकातल्या  ११ पैकी एकही लेख कंटाळवाणा वाटत नाही. 
मुंबईत पत्रकारीता करण्याचे काही फायदे आहेत जे लेखिकेसारख्या पत्रकारांना आवाका असेल
तितके आणि तसे काम करण्याची संधी सहज मिळवून देतात. मानवी अधिकारांबाबत सातत्याने
लिखाण करणाऱ्या पत्रकारांना मानवी अधिकारांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या
स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या देशांत परिषदांना आणि ग्राऊंड रिपोर्ट करायला आमंत्रित करीत
असतात. मुंबईत राहून काम करणाऱ्या पत्रकारांना परिषदांना जाऊन अभ्यास करण्याची संधी
मिळत राहाते. अशाच परिषदांच्या निमित्ताने लेखिकेला पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये
जाण्याची संधी मिळाली आहे. त्यातून तयार झालेले दोन्ही लेख अत्यंत वेगळे आहेत. 
श्रीलंकेत अनेक वर्षे सुरू असतलेली यादवी समूळ संपवताना तिथल्या तमीळ लोकांशी सरकार,
सैन्य कसे वागले याची अत्यंत करूण आणि हादरवणारी कहाणी लेखिका सांगते. अर्थात, तिथल्या
लोकांशी दुभाषांच्या माध्यमातून संवाद साधत पीडितांच्या तोंडूनच या कथा सांगितल्या गेल्या आहेत.
श्रीलंकेतील एलटीटीई अर्थात, लिबरेशन टायगर्स ऑफ तमील ईलम या संघटनेला भारतातून कसे
छुपे सहाय्य मिळत होते आणि त्यामागे  तामिळनाडूतील मतांसाठी केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांचे
डोके कशा प्रकारे चालत होते याचे अनेक संदर्भ वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये पूर्वीच येऊन गेले आहेत.
त्याचा किंचतसाही उल्लेख या लेखात येत नाही. पण श्रीलंकेतील तमीळ नागरिकांवर
सैन्याधिकाऱ्यांकडून होणारे अत्याचार, त्यांच्यातील तरुणांचे ते केवळ तामिळी आहेत म्हणून होणारे
हत्यांकांड, कायद्याची अस्तित्वहीनता याचे अत्यंत परखड वर्णन लेखिका बिनदिक्कतपणे करते.
बौद्ध हा श्रीलंकेतील बहुसंख्यांकांचा धर्म. बहुसंख्यांक असूनही असुरक्षिततेची भावना लोकांमध्ये
निर्माण करून द्यायची आणि त्याचा राजकीय लाभ उठवायचा, हा बहुतांश देशातील सत्तापिपासूंचा
हेतूपूर्तीचा सोपामार्ग. श्रीलंकेतही याच असुरक्षिततेच्या भावनेतून बहुसंख्यांक बौद्धांकडून मुस्लीम
धर्मियांवर दहशत बसविण्यासाठी होणारे प्रकार प्रगति यांनी मांडले आहेत. 
पाकिस्तानशी संबंधित दोन रिपोर्टाज् या पुस्तकात आहेत. मुंबईचा एक उच्चशिक्षित तरूण समाज
माध्यमांतून ओळख झालेल्या पाकिस्तानातील तरुणीच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी म्हणून
मोठा धोका पत्करून अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात कसा पोहोचतो, तिथल्या तुरुंगात डांबला
गेल्यानंतर त्याच्या अस्तित्वाविषयीच बाळगले गेलेले गुढ आणि शेवटी महत् प्रयासाने झालेली त्याची
सुटका हे एखादा चित्रपट पाहातो आहोत असे वाटायला लावणारे घटनाक्रम लेखिकेने अत्यंत
कौशल्याने आणि संयमाने हाताळले आहेत. यात सर्वाधिक आकर्षित करते ते त्या देशातल्या
मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचे धारिष्ट्य आणि सीमांच्या किती तरी पल्याड जाणारी
त्यांच्यातील मानवतावादी सहृदयता. एक तरूण मुलगी पत्रकार म्हणून काम करता करता
पाकिस्तानात त्या तरूणाचा शोध घेऊ लागते, त्या प्रयत्नांना दाद न देणाऱ्यांच्या विरोधात आवाज
उठवते आणि त्याचे जीवावर बेतावे असे परिणामही भोगते. तिच्या सारख्या आणखीही काही व्यक्ती
या रिपोर्टाज् मध्ये येतात आणि देशांच्या सीमा या केवळ राजकारण्यांना राजकारण करता यावे
म्हणून आखल्या गेल्या आहेत याची जाणीव हे प्रकरण वाचणाऱ्यांना होत राहाते. पाकिस्तानशी
संबंधित दुसरा एक लेख लाहोर या शहराविषयी आहे. लाहोरी आदरातिथ्य काय असते, तिथले
खाद्य पदार्थ, रस्ते, इमारती यांची छानशी सफर लेखिका तिच्या शैलीत वाचकाला करवून आणते.
एक लेख खरे तर गुजरातमधील मच्छीमारांच्या जगण्यावर आहे. पण त्यातही पाकिस्तानी
तटरक्षकांनी अटक केल्यानंतरचे भारतीय मच्छीमारांचे हाल, त्यांच्या कुटुंबियांची होणारी फसवणूक,
त्यातून होणारी वाताहत, भारताचे कैदी हस्तांतरणाबाबतचे धोरण यावर अधिक भाष्य आहे. 
या पुस्तकातील दोन लेख ट्रान्सजेंडर लोकांच्या जगण्याची ओळख करून देणारे आहेत. त्यातील
एक गौरी या तृतियपंथीच्या आयुष्याचा आलेख मांडणारा आहे आणि दुसरा एकूणच या वर्गातील
लोकांच्या जगण्यावर, त्यांच्या वागण्यात, राहाण्यात होत असलेल्या बदलावर बेतलेला आहे. एकीकडे
बाईची लक्षणे दिसतात म्हणून कुटुंबियांनी तोडलेले आणि दुसरीकडे समाज जोडून घ्यायला तयार
नाही. अशा अवस्थेत या व्यक्ती एकमेकांचाच आधार कसा बनतात, त्यांच्या भावनीक, शारीरिक
ओढाताणीतून होणारी त्यांची कुतरओढ कशी हृदयद्रावक असते याचे यथार्थ वर्णन लेखिका करते.
हा लेख केवळ माहितीवर आधारलेला नाही. त्यांच्यापैकी अनेकींशी मैत्री करून, त्यांच्या सहवासात
वेळ घालवून, त्यांच्याकडून सुरू झालेली स्वाेद्धाराची कामे प्रत्यक्ष पाहून हे दोन्ही लेख लिहिलेले
असल्यामुळे ते या त्रिशंकू जगण्यातील दाहकता वाचकाला हेलावून टाकते. 
उर्वरित लेख हे सर्वसामान्यांसाठी फारशा अज्ञात नसलेल्या विषयांवर आहेत. हरियाणात
वेगवेगळ्या एनजीओंमार्फत वंचित मुला-मुलींच्या शिक्षणासाठी उद्धारासाठी सुरू असलेल्या
कामाची ओळख करून देणारा एक लेख व्हाईट काॅलर वर्गासाठी दृष्टीपल्याडच्या जगाची ओळख
करून देणारा आहे. स्वयंसेवी संस्था हळूहळू का असेना, पण ‘नाही रे’ वर्गाचे जगणे आणि जाणीवा
बदलण्यात यशस्वी होत असल्याचा सुखावणारा अनुभव या लेखातून येतो. एक लेख बालाघाटातील
म्हणजे बीड जिल्हा आणि परिसरातील बालविवाहाची स्थिती किती विदारक आहे आणि बालपणीच
किती मुलींचे जगणे नरक बनते आहे हे सांगत जातो. त्याच भागातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील
काही जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणावर येणारी गदा दाखवून देणाऱ्या दुसऱ्या
एका लेखात पत्रकार असलेली ही लेखिका व्यवस्थेच्या गलथान कारभाराच्या चिंध्या वेशीवर टांगते.
त्यातही काही सुखावणारी उदाहरणे आणि व्यक्ती, संस्थांचा परिचय करून देत आंधार भेदायलाही
काही पणत्या जळत असल्याची जाणीव करून देते. मुंबईतील भटक्या जमातींच्या जगण्यावर प्रकाश
टाकणारा एक लेख फारसा खोलात जाऊन लिहिला आहे असे वाटत नाही. अर्थात, त्या विषयाचा
व्याप आणि आवाका असा एखाद्या लेखात मावणारा नाहीच. त्यामुळे लेखिकेने जे काही केले आहे
ते खूप तोकडे आहे याची जाणीव असल्याची नोंदही केली आहेच. शेवटच्या लेख पत्रकारांसाठी
नेहमीचा आणि आवडीच्या विषयावरचा आहे. अर्थात, गावागावात निवडून येणाऱ्या सरपंच, पंच
आणि इतर पदाधिकारी महिलांचे काय चालले आहे याचा आढावा प्रत्यक्ष त्या महिलांशी बोलून,
त्यांच्या टीकाकारांशीही संवाद करून लिहिला आहे. एरवी ज्याकडे पाहिले जात नाही त्या महिलांच्या
सकारात्मक ऊर्जेवर आणि कामांवर प्रकाश टाकण्यात आल्यामुळे वेगळे काही वाचल्याची थोडी
अनुभूती मिळते. गेल्या काही वर्षात लिहीलेले हे लेख असल्यामुळे त्यांचे संदर्भमूल्य कमी होऊ नये
म्हणून त्या बाबतीत सध्या काय परिस्थिती आहे, याची जोडही या लेखांना शेवटी देण्यात आली आहे.
त्यामुळे शिळेपणाच्या दोषापासून आपोआपच मुक्ती मिळाली आहे. 
एकूणच, केवळ ‘फिक्शन’मध्ये रमायला ज्यांना आवडत नाही आणि वास्तववादी लेखनातील
जडपणाही पेलवत नाही त्यांच्यासाठी कथामूल्य असलेले हे सर्वच वास्तववादी लेख नक्कीच
वाचनानंद देणारे आहेत. तेवढेच नाही, अंतरमनातील मानवतेला साद घालण्याची ताकदही या
प्रसंगांमध्ये आणि प्रणिती यांच्या निवेदनशैलीत पुरेपूर आहे. मला हे पुस्तक आवडले आहे. 

माझ्या दृष्टीने ..
लेखनशैली : १० पैकी ०९
प्रासंगिकता : १० पैकी ०८
निर्मिती मूल्य : १० पैकी ९.५
एकूणात गुण :  १० पैकी ०९ 
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे
पाने :  १८४
किंमत : २४० रुपये 
—--------------------------

Sunday, February 27, 2022

नवाब मलिकांची अटक अन् भाजपची चाल

 

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना ज्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात ईडीने आता अटक केली आहे ते प्रकरण दोन दशकांपूर्वीचे आहे. त्यामुळे मलिक फार बोलत होते हेच त्यांच्या अटकेचे खरे कारण आहे; जमीनीचे प्रकरण तर निमित्त आहे, अशी टीका राज्यातली राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्तेतले तिचे मित्रपक्ष करीत आहेत. त्या टीकेत तथ्य नाही, असे नाही. काही प्रमाणात तेही खरे आहेच; पण त्याहीपेक्षा वेगळा विचार भाजपच्या नेत्यांनी मलिक यांच्या अटकेचे निर्देश ईडीला देऊन केलेला दिसतो. त्याकडे अजून कोणाचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. 


मुंबई महापालिकेत शिवसेनेचे प्राण आहेत. तिथूनच या पक्षाला आर्थिक ताकद मिळत आली आहे हे उघड आहे. त्यामुळे इथून शिवसेनेची सत्ता घालवायचीच याकडे भाजपच्या नेत्यांनी सध्या लक्ष केंद्रीत केलेले दिसते. गेल्या किमान तीन दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आता गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्रीपदही शिवसेनेकडे आहे. त्याअर्थाने राज्यातही शिवसेनेची सत्ता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे हे सरकार फार दिवस टिकणार नाही आणि पुन्हा आपल्याला सत्तेत येता येईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते; पण तसे काही घडले नाही. यापुढेही तसे काही घडेल असे दिसत नाहीये. मधल्या काळात सत्ताधारी आमदारांना फोडून सरकार पाडण्याचे प्रयत्नही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी करून पाहिले; पण केंद्रातील नेतृत्वानेच त्यांना त्यासाठी साथ दिली नाही. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या भाजप नेत्यांना मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा झेंडा खाली उतरवून शिवसेनेला धडा शिकवायची खुमखुमी आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्या अटकेकडे पाहिले पाहिजे.


जर ‘गुन्हा’ २०-२२ वर्षांपूर्वीचा आहे तर मग मलिक यांच्यावर कारवाई करायला इतकी वर्षे का लागलीत? हा सर्वसामान्यांनाही पडलेला प्रश्न आहे. त्याचे उत्तर मलिक यांच्या अलिकडच्या नित्याच्या पत्रकार परिषदांमध्ये जसे आहे तसेच ते महापालिका निवडणुकीच्या राजकारणातही आहे. आत्ताच अटक केली गेली, कारण आता महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यात मलिक यांच्या अटकेचा भाजपला काय आणि कसा फायदा होऊ शकतो, हे बारकाईने समजून घ्यावे लागेल. 


महाआघाडी एकत्र लढली तर भाजपचे मोठे नुकसान होते, हे आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेबरोबर युती करायला तयार होईल, यात शंका नाही. कारण एकतर या महानगरात या दोन पक्षांची सद्दी फारशी राहिलेली नाही हे महापालिकेच्या गेल्या अनेक निवडणुकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर राहून झाला तर या दोन्ही पक्षांना फायदाच होणार आहे. प्रश्न आहे तो शिवसेनेचा. मागच्या निवडणुकीत सेना स्वतंत्रपणे लढूनही सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. शिवाय, शिवसेनेची मुंबईत लढत कधीच या दोन पक्षांशी नसते. कारण त्यांचे आणि शिवसेनेचे मतदार अगदीच भिन्न आहेत. त्यांच्यामुळे मतविभाजनाचा धोकाही नसतो. त्यामुळे दोन्ही काँग्रेसशी महापालिका निवडणुकीत आघाडी करून शिवसेनेला काहीही फायदा होणार नाही. झाले तर नुकसानच होणार आहे, नुकसान असे की, जिथे शिवसेनेचे कार्यकर्ते थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत तिथे यंदा ते पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढायला सज्ज असतील. ते मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी सोडले तर शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज होण्याचीच शक्यता आहे. शिवाय, मुंबईच्या मतदारांना दोन्ही काँग्रेसबरोबर गेलेली शिवसेना कितपत रुचेल हाही प्रश्नच आहे. पण राज्यातले सरकार टिकवण्यासाठी आणि सत्ता स्थापायला नगरसेवकांची संख्या कमी पडली तर उपयोग व्हावा यासाठी शिवसेना या दोन पक्षांबरोबर जायला तयार झाली तरी आश्चर्य वाटायला नको. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवाब मलिक यांच्यावरील कारवाईची वेळ भाजपने साधली आहे.



नवाब मलिक यांच्या या अटकेने काय साध्य होईल? तर ध्रुवीकरणाला मदत. भाजपचा नेहमीच ध्रुवीकरणावर भर असतो. अन्य कोणत्या मुद्यांनी सत्ता मिळत नाहीये असे लक्षात आले की भाजपवाले हिंदूत्वाचा आाणि देशप्रेमाचा मुद्दा पुढे करतात. नवाब मलिक हे मुस्लीम आहेत आणि त्यांचा संबंध या प्रकरणाच्या निमित्ताने थेट देशद्रोही दाऊदच्या कुटुंबाशी जोडला गेला आहे. दाऊदने घडवून आणलेले बाॅम्बस्फाेट ही मुंबईकरांची दुखरी नस आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे धर्माने मुस्लीम असलेल्या नवाब मलिक यांचा दाऊदशी आलेला हा संबंध हिंदूत्ववादी विचारांच्या मतांना एका ध्रुवावर एकत्रित करायला फार मोठा मुद्दा मुंबईत तरी बनणार आहे. आजपर्यंत अशा मुद्यांवरच मुंबईत शिवसेना मोठी होत राहीली आहे. पण तिच शिवसेना आज नवाब मलिकांना साथ देते आहे हे दाखवण्याची संधी भाजपची मंडळी साधतील आणि शिवसेनेची मते आपल्याकडे वळवतील, असे चित्र आजच दिसू लागले आहे. 


हा झाला थेट मतांचा फायदा. आणखी एक राजकिय गणित यामागे असू शकते. राष्ट्रीय पक्ष आणि हिंदूत्ववादी मोदींना पराभूत करू शकणारा एकमेव पक्ष म्हणून  मुस्लीम मते काँग्रेसकडे आकर्षित होत आली आहेत. मागच्या काही वर्षांत ओवेसींच्या एमआयएम पक्षाने मुस्लींम मतांवर गारूड करण्याचा प्रयत्नही महाराष्ट्रात केला आहे. पण त्या पक्षाचा फायदा भाजपलाच होतो हे मुस्लीम मतदारांच्या लक्षात यायला लागले आहे, असे म्हणतात. ते खरे असेल तर काँग्रेसच मजबूत होणार. भाजपला काँग्रेसला कोणत्याही पातळीवर संजीवनी मिळायला नको आहे. त्यामुळे मुस्लीम मतांना काँग्रेसकडून इतरत्र वळवायचे असेल तर एकतर एमआयएम किंवा समविचारी अन्य पक्ष हवा. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवाब मलिकांच्या निमित्ताने घेऊ शकेल आणि तेच भाजपच्या फायद्याचे ठरणारे आहे. भाजपला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढलेला कधीही परवडणारे आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.






Saturday, April 3, 2021

डाॅ. आंबेडकरांच्या धनंजय कीर लिखीत चरित्राच्या निमित्ताने...

 ‘डाॅ. आंबेडकरांनी स्वतः वाचून मान्यता दिलेले एकमेव विश्वसनीय चरित्र!’ कव्हर पेजवर अशी मोहोर असलेले बाबासाहेबांचे चरित्र वाचण्याचा जुना संकल्प नुकताच पूर्ण झाला. बाबासाहेबांविषयी वाचलेले हे काही पहिले पुस्तक नाही. त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाविषयी आकर्षण शालेय जीवनातच निर्माण झालेलं. वयाबरोबर त्यांच्या विषयीचे वाचन वाढत गेले तसा त्यांच्याविषयीचा आदर आणि कृतज्ञता भावही वाढत गेलेला. त्यातून अनेक पुस्तकांचा संग्रह होत गेला. त्यातली प्रसंगानुरूप वाचलीही जात होती; पण धनंजय कीर यांनी लिहिलेलं त्यांचं हे चरित्र वाचायला सुरुवात करायची हिम्मत होईना. एक तर त्याचा आकार अवाढव्य (६६५ पाने). ते तुकड्या तुकड्याने वाचण्याची इच्छा नव्हती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत एकूणच मनाची अवस्था आणि इतर काही संकल्प यामुळेही ते शक्य झालं नाही. दुसऱ्या लाटेने मात्र ते साध्य करवून दिलं. 




धनंजय कीर हे लेखक म्हणून मला परिचित आहेत ते त्यांनी लिहिलेल्या महान व्यक्तिमत्वांच्या चरित्रांमुळे. महात्मा ज्योतिराव फुले, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज हे त्यांचे चरित्र नायक. माझ्या वाचनात मात्र यापैकी एकही अजून आलेलं नव्हतं. बाबासाहेबांचे चरित्र वाचल्यानंतर मात्र, त्यांनी महात्मा गांधींच्या चरित्रात काय लिहिले आहे, हे वाचनाची मोठीच उत्सुकता लागली आहे. ते लवकरच मिळवून वाचण्याचा संकल्प हे पुस्तक वाचून संपविताना झाला आहे. त्याला कारण आहे. बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यातील संबंधांवर कीर यांनी बऱ्यापैकी सविस्तर प्रकाश टाकला आहे. तो टाकत असताना ते बाबासाहेबांचे चरित्र लिहित होते आणि त्यामुळे जे काही लिहिले आहे ते त्यांचा पक्ष कसा योग्य होता हे वाचकाच्या मनावर बिंबवण्याच्या हेतूने. स्वाभाविकच महात्मा गांधींच्या विचारांच्या मर्यादा, कृतीतील दोष आणि विरोधाभास यांच्यावर लेखकाने अतिशय स्पष्टपणे टीका टिपणी केली आहे. मात्र, महात्मा गांधींविषयीचे त्यांचे ते मत त्यांचे चरित्र लिहितानाही कायम होते का? या विषयी मला आता उत्सुकता निर्माण झाली आहे.


धनंजय कीर यांनी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या या चरित्राची काही वैशिष्ट्य आहेत. एक तर ते ओघवत्या भाषेत लिहिलं गेलं आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील घटनांची सनावळीनुसार नोंद करून त्याबरहुकूम कीर यांनी लेखन केलेलं दिसतं. त्यामुळे बाबासाहेबांचा जीवनपट एखादा सरळ सोपा चित्रपट पुढे सरकत जावा तसा सरकत जातो. मागची घटना आठवायची आणि त्यानुसार अर्थ लावायचा असा द्राविडी प्राणायाम वाचकाला करावा लागत नाही. अर्थात, अनेकवेळा शैली असेल तर तशा गिरक्याही वाचनाचा आनंद वाढवतात हे खरं; पण या चरित्राचा एकूणच वाचक डोळ्यासमोर ठेवून कीर यांनी प्रयत्नपूर्वक सोप्या शैलीत हे लिहिले असावे. अर्थात, त्यांनी लिहीलेली अन्य चरित्र वाचल्यानंतर कदाचित यावर भाष्य करता येईल; पण एकूणच अभ्यासकांपासून नवशिक्षितापर्यंत सर्वांना गुंतवून ठेवत कीर यांचे कथन पुढे सकरत जाते.(थोडक्यात काय, तर नियमित वाचनाची सवय नसणाऱ्यांनीही हा ग्रंथ वाचायची हिम्मत करायला हरकत नाही.)


धनंजय कीर यांनी आधी हे चरित्र इंग्रजीत लिहिले. Dr. Ambedkar : Life and Mission या नावाने १९५४ साली ते प्रकाशित झाले. त्या आधीच बाबासाहेबांनी ते वाचले असावे. तोपर्यंत धर्मांतर झालेले नव्हते. म्हणजे पुढचा भाग त्यांच्या निधनानंतर मराठी ग्रंथासाठी म्हणून लिहिला गेला. मी वाचली ती २०१६ साली प्रसिद्ध झालेली सातवी आवृत्ती आहे. त्यात काही संदर्भ दुरुस्त करण्यात आले असल्याचा खुलासा प्रकाशकांनी केला आहे. अभ्यासकांसाठी बाबासाहेबांशी संबंधित सनावळ त्यात स्वतंत्रपणे जोडली आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकांची बरीच मोठी यादीही त्यात समाविष्ट करण्यात आली आहे. शिवाय, काही नव्याने मिळालेली छायाचित्रेही या आवृत्तीत आहेत. त्यामुळे संशोधकांसाठी हे पुस्तक बरेच काही देऊन जाते. 


मला आवडलेलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या संदर्भात आणि वेगवेगळ्या प्रश्नांवरचे बाबासाहेबांचे विचार या पुस्तकात एकत्रितपणे कळतात. त्यात प्रसंगानुरूप होत गेलेले बदलही समोर येतात. शिवाय, जसजसे बाबासाहेब पुस्तके लिहीत गेले तसतसे ते संदर्भ तर पुस्तकात येतातच, शिवाय त्या पुस्तकात नेमके कोणते विचार व्यक्त करण्यात आले आहेत, याचाही धावता संदर्भ लेखकाने आवर्जून दिला आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या पुस्तकांचाही परिचय वाचकाला होत जातो. त्यामुळे हे चरित्र वाचून संपते तेव्हा खूप काही मिळाल्याची अनुभूती वाचकाला येते. 

राज्यसभा टीव्हीने संविधानाच्या निर्मितीवर १० भागांची एक डाॅक्युमेंटरी बनवली आहे. त्यात ज्यावेळी स्वातंत्र्य मिळणार होते त्यावेळी बनवायच्या मंत्रिमंडळात डाॅ. आंबेडकरांना घ्यावे, असा आग्रह महात्मा गांधी यांनी नेहरू आणि सरदार पटेल यांच्याकडे धरला होता असे एक दृश्य दाखवण्यात आले होते. तो संदर्भ या पुस्तकात सापडला नाही. आपण काँग्रेसच्या विरोधात असूनही आपल्याला मंत्रिमंडळात कसे घेतले या विषयी बाबासाहेबांनाही आश्चर्य वाटत होते असा संदर्भ चरित्रात येतो. याचा अर्थ एक तर नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचा निर्णय आपला आहे असे सांगितले असावे किंवा गांधींविषयी असलेल्या एकूणच रागातून डाॅ. आंबेडकरांनी त्यावर विश्वास ठेवला नसावा, अशीही शक्यता आहे. 


धर्मांतराच्या आधी डाॅ. आंबेडकरांना त्यांचे ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे पुस्तक प्रकाशित करायचे होते; ते त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकले नाही. त्या पुस्तकात बाबासाहेबांनी मांडलेला बौद्ध धर्म हा गौतम बुद्धाने सांगितलेला मूळ धम्म नाही, अशी टीका बुद्धीस्ट तज्ञांनी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर केली. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांना दोषही दिले; पण त्या संदर्भात स्पष्टीकरण द्यायला किंवा आपले म्हणणे नीटपणे मांडायला बाबासाहेब नव्हते. त्यामुळे त्यांनी सांगितलेला धम्म हा बुद्धाचा धम्म नाही तर आंबेडकरांचा धम्म आहे असे म्हणणाऱ्यांचा प्रतिवाद झाला नाही. ग्रंथ त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाला असता तर हे सर्व होऊ शकले असते. या ग्रंथाच्या अनुशंगाने आणखी एक बाब धनंजय कीर यांनी समोर आणली आहे. या ग्रंथासाठी बाबासाहेबांनी उपोद्घात लिहून ठेवला होता. तो मात्र ग्रंथ प्रकाशित झाला त्यावेळी त्यात समाविष्ट करण्यात आलेला नव्हता. असे का झाले असावे, याचे उत्तर धनंजय कीर यांना सापडलेले नाही; पण हे प्रकरण वाचत असताना वाचकाला मात्र ते सहज सापडते. त्यासाठी तो ग्रंथ वाचायला हवा. 


या देशातल्या या प्रकांड पंडिताला, कायदेतज्ञाला, संसदपटूला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभाव पाडू शकणाऱ्या मुस्सद्याला आपली बहुतांश ताकद एका समाज घटकाला किमान मानवी संधी मिळवून देण्यासाठी खर्च करावी लागली. तशी वेळ तत्कालिन व्यवस्थेने, ब्राह्मणशाहीने त्यांच्यावर आणली नसती तर ही महान विभूती देशाच्या स्वातंत्र्य आणि उत्थानासाठी पूर्णांशाने कामी आली असती. तसे झाले असते तर आज भारताचे चित्र कदाचित खूप पुढचे राहीले असते. ती वेळ त्या व्यवस्थेने आणली नसती तर अस्पृशांचीही ताकद, बुद्धीमत्ता आणि शौर्य देशाच्या उत्थानाच्या कामी त्याच वेळी आले असते आणि आजचा भारत खूप वेगळा आणि प्रगत राहिला असता असे मला सतत वाटत आले आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेले हे चरित्र वाचल्यानंतर ती भावना अधिक दृढ झाली आहे.